कणकवलीत ९ नोव्हेंबरला भव्य वारकरी दिंडी सोहळा; हजारो वारकरी सहभागी होणार

Spread the love

संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ७५० व्या जन्मोत्सवानिमित्त आणि संत तुकाराम महाराजांच्या ३७५ व्या वैकुंठगमन उत्सवानिमित्त सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदायाच्या वतीने कणकवली येथे ९ नोव्हेंबर रोजी भव्य दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यात प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणावर वारकरी एकत्र येणार असल्याने संपूर्ण तालुक्यात भक्तिमय वातावरण तयार झाले आहे.

या दिंडीचे प्रस्थान सकाळी ८.३० वाजता एस.टी. वर्कशॉप येथील गणेश मंदिरातून होणार असून, दिंडी परमपूज्य भालचंद्र बाबा महाराज मठ येथे पोहोचल्यानंतर मेळाव्यात रूपांतरित होईल. जिल्ह्यातील सर्व विणेकरी, ५१ वारकरी पताकाधारी, ३७५ मृदुंग वादक, ३७५ महिला कळस घेऊन, तसेच ३७५ महिला तुळस घेऊन आणि तब्बल ७५० टाळकरी वारकरी या सोहळ्यात सहभागी होणार आहेत. दिंडीमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व वारकरी बांधवांना “सन्मानपत्र” प्रदान केले जाईल.

या ऐतिहासिक सोहळ्यासाठी सकाळी ८.३० वाजेपर्यंत गणेश मंदिर परिसरात जमण्याचे आवाहन आयोजकांनी केले असून वारकऱ्यांसाठी चहा-नाश्त्याचीही व्यवस्था करण्यात आली आहे. जिल्ह्यात सुरू असलेल्या विविध वारकरी कार्यक्रमांमधून या दिंडीची माहिती देण्यात येत असून अधिकाधिक वारकरी मंडळींनी सहभागी व्हावे, असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदायाने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *