बालकवींच्या कवितांचे गारुड शतकानंतरही कायम: ‘बालकवी : एक शापित गंधर्व’ या कार्यक्रमात सतीश लळीत यांचे प्रतिपादन

Spread the love

बालकविता, निसर्गकविता आणि गूढगंभीर अर्थवाही कविता अशा काव्याच्या विविध प्रकारात बालकवींनी अत्यंत ताकदीने स्‍वच्छंद विहार केला. अवघे २८ वर्षांचे आयुष्य लाभलेल्या या विलक्षण प्रतिभावान कवीचे गारुड त्यांच्या निधनाला शतक उलटले तरी आजही टिकून आहे, असे प्रतिपादन निवृत्त माहिती उपसंचालक सतीश लळीत यांनी नुकतेच येथे केले.

‘घुंगुरकाठी’प्रणित ‘आम्ही साहित्यप्रेमी’ व्यासपीठाच्या आठव्या मासिक कार्यक्रमात ते बोलत होते. दीड तासाहून अधिक वेळ चाललेला हा कार्यक्रम रसिकांची दाद घेऊन गेला. ओरोस येथील दत्तराज सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या सांस्कृतिक सभागृहात ‘बालकवी : एक शापित गंधर्व’ हा कार्यक्रम झाला. मालवणी बोलीला प्रतिष्ठा मिळवून देणारे नाटककार ‘वस्त्रहरण’कार गंगाराम गवाणकर यांना सुरुवातीला श्रद्धांजली वाहण्यात आली. कार्यक्रमात प्रिया आजगावकर, मनोहर सरमळकर, डॉ. सई लळीत, प्रगती पाताडे, वैदेही आरोंदेकर, नम्रता रासम, अपर्णा जोशी, ॲड. सुधीर गोठणकर यांनी सहभाग घेतला.

        बालकवींच्या काव्यविषयक कारकिर्दीचा आढावा घेताना श्री. लळीत म्हणाले की, १९०७मध्ये जळगाव येथे 'काव्यरत्नावलीकार' नानासाहेब फडणीस यांनी पहिले कविसंमेलन आयोजित केले. त्यावेळच्या दिग्गज कवींच्या उपस्थितीत झालेल्या या संमेलनात बालकवींनी वयाच्या अवघ्या सतराव्या वर्षी सादर केलेल्या कवितेने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. श्री. फडणीस यांनी त्यांना तेथेच 'बालकवी' ही पदवी जाहीर केली आणि संमेलनाध्यक्ष कर्नल का. र. कीर्तिकर यांच्याहस्ते त्यांना प्रदान केली. बालकवींना निसर्गकवी म्हणून ओळखले जाते. मात्र उत्तम अशा बालकविता आणि निसर्गकवितांबरोबरच त्यांनी 'औदुंबर'सारखी गूढकविता लिहिली. 'आनंदी आनंद गडे' किंवा 'श्रावणमास' सारख्या आनंदी कवितांबरोबरच 'उदासिनता', 'पारव्यास', 'दुबळे तारु', 'शून्य मनाचा घुमट' अशा खिन्नता आणि निराशेने भरलेल्या त्यांच्या कविताही अजरामर झाल्या. कल्पनांचे सहजपण, रचनेतील सरलता आणि वर्णमाधुर्य ही त्यांच्या कवितेची वैशिष्ट्ये होती.

        डॉ. सई लळीत यांनी बालकवी आणि लक्ष्मीबाई टिळक यांच्या नात्याच्या गहिऱ्या संबंधांची माहिती दिली. बालकवींचे पालनपोषण रेव्हरंड ना. वा. टिळक आणि लक्ष्‍मीबाईंनी केले. अतिशय हुशार पण तितकेच खोडकर असलेले बालकवी लक्ष्मीबाईंच्या कशा खोड्या काढीत, याचे वर्णन त्यांनी अनेक उदाहरणे देवून केले.

मनोहर सरमळकर यांनी ‘औदुंबर’ कविता सादर करुन एक निसर्गकविता या अंगाने तिचे रसग्रहण केले. ॲड. सुधीर गोठणकर यांनी ‘औदुंबर’ या निसर्गकविता वाटणाऱ्या या गुढ कवितेचा आध्यात्मिक अर्थ उलगडून दाखवला. वरवर पाहता ही निसर्गकविता वाटली तरी निसर्गाच्या रुपकातून बालकवींनी जीवनविषयक तत्वचिंतन कमीत कमी शब्दात मांडले आहे, असे ते म्हणाले.

नम्रता रासम यांनी बालकवी हे मराठी कवितेला पडलेले स्वप्न होते, असे सांगून बालकवी हे निसर्गाशी तादात्म्य साधलेले प्रतिभावान कवी होते. सहजसोप्या निरागस बालकवितांबरोबरच त्यांनी भयानकतेचा अनुभवही शब्दबद्ध केला, असे सांगितले. बालकवींच्या अनेक कवितांचा आढावा त्यांनी घेतला व त्यामधील शब्दसामर्थ्य आणि अर्थ उलगडून दाखवले. वैदेही आरोंदेकर यांनी ‘घरटे’ या बालकवितेचे रसग्रहण केले. घरटे नष्ट झालेली छोटीशी चिमणी पोपटाच्या पिंजऱ्याचे आमिष नाकारुन स्वातंत्र्य निवडते, असे त्या म्हणाल्या. प्रगती पाताडे यांनी बालकवींच्या ‘उदासीनता’ कवितेचे वाचन केले. प्रिया आजगावकर यांनी ‘आनंदी आनंद गडे’ तर अपर्णा जोशी यांनी ‘श्रावणमास’ ही कविता सादर केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *