त्रिभाषा सूत्रानुसार सर्व शाळांमध्ये मराठी बंधनकारक करण्यात आली. पण, महाराष्ट्रातील गुजराती, सिंधी, तेलुगू, तमीळ, उर्दू भाषिक पहिलीतील विद्यार्थ्यांना मराठी सहजपणे समजावी म्हणून स्वतंत्रपणे सोप्या शब्दांतील मराठीच्या पुस्तकांची ‘बालभारती’कडून छपाई सुरू केली आहे. मराठीबद्दलची गोडी वाढावी हा त्यामागील हेतू आहे.
नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार आता २०२५-२६ या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम बदल झाला असून ‘बालभारती’ने पहिल्या वर्गासाठी ४७ लाख पुस्तकांची छपाई केली आहे.
यंदा पहिलीच्या विद्यार्थ्यांची पाठ्यपुस्तके वह्यांच्या पानाशिवाय असतील. इयत्ता पहिली ते आठवीची सर्व नियमित पाठ्यपुस्तके शाळा सुरू होण्यापूर्वी विद्यार्थ्यांना मिळणार आहेत. इयत्ता पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठी खेळू-करू-शिकू या पाठ्यपुस्तकाऐवजी शिक्षक हस्तपुस्तिकेची निर्मिती करण्यात येत आहे.
मराठीशिवाय अन्य माध्यमांच्या शाळांमधील पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘मजेत शिकूया’ असे मराठीचे पुस्तक असणार आहे. मुलांना भाषेची आवड निर्माण व्हावी, दिसायला आकर्षक दिसावी, त्यातून त्यांची वाचन व आकलन क्षमता वाढेल, अशी रचना पाठ्यपुस्तकांची असल्याचेही ‘बालभारती’च्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
२०२५-२६ या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता पहिलीच्या वर्गाचा अभ्यासक्रम तथा पाठ्यपुस्तके नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार छपाई करण्यात आली आहेत. २०२६-२७ या शैक्षणिक वर्षात दुसरी, तिसरी, चौथी व सहावीच्या वर्गाचा, २०२७-२८ साली पाचवी, सातवी, नववी व अकरावीच्या विद्यार्थ्यांची पाठ्यपुस्तके बदलणार आहेत. तर २०२८-२९ या शैक्षणिक वर्षात महत्त्वाच्या आठवी, दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम बदलणार आहे.