मालवण, दि. प्रतिनिधी –
आचरे (ता. मालवण) येथील सानेगुरूजी कथामालेचे ज्येष्ठ कार्यकर्ते सुरेश ठाकूर (गुरूजी) यांना अखिल भारतीय सानेगुरूजी कथामालेचा मानाचा केंद्रीय ‘बालसेवा पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे. कोल्हापूर येथे पार पडलेल्या निवड समितीच्या बैठकीत एकमताने ठाकूर गुरूजी यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. अखिल भारतीय सानेगुरूजी केंद्रीय समितीचे अध्यक्ष मा. हसन देसाई (कोल्हापूर) व सचिव सुनील पुजारी (सोलापूर) यांनी आज ही घोषणा केली.
या पुरस्काराचे स्वरूप दहा हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह, मानपत्र, शाल व श्रीफळ असे असून पुरस्कार वितरण रविवार, दि. ११ जानेवारी २०२६ रोजी बेळगाव येथे होणाऱ्या कथामालेच्या राष्ट्रीय अधिवेशनात करण्यात येणार आहे.
अखिल भारतीय सानेगुरूजी कथामालेचे कार्याध्यक्ष लालासाहेब पाटील यांनी ठाकूर गुरूजी यांचे अभिनंदन करताना, “कथामालेचे संस्थापक प्रकाशभाई मोहाडीकर यांच्या विचारधारेनुसार ग्रामीण भागात निष्ठेने कार्य करणाऱ्या कार्यकर्त्याचा आज गौरव झाला आहे,” असे गौरवोद्गार काढले.
सुरेश ठाकूर (गुरूजी) गेल्या अर्धशतकाहून अधिक काळ बालसेवेचे कार्य अविरतपणे करीत आहेत. सन १९७२ पासून त्यांनी सानेगुरूजी कथामालेच्या कार्यासाठी तन, मन व धन अर्पण केले आहे. ‘करी रंजन जो मुलांचे जडेल नाते प्रभूशी तयांचे’ हा सानेगुरूजींचा मूलमंत्र प्रमाण मानून त्यांनी कोकण विभागात ‘शाळा तेथे कथामाला’ हा उपक्रम प्रभावीपणे राबविला. आतापर्यंत त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात सत्तरहून अधिक ठिकाणी ‘कथामाला तंत्र आणि मंत्र’ या विषयावर मार्गदर्शन शिबिरे घेतली आहेत.
मुलांना कथा कशा सांगाव्यात, या विषयावर मुंबई, पुणे, रत्नागिरी व सिंधुदुर्ग येथील आकाशवाणी केंद्रांवरून त्यांची प्रबोधने झाली आहेत. मुंबई दूरदर्शन केंद्रावरून ‘कथाकथन तंत्र आणि मंत्र’ या विषयावरील त्यांची मुलाखतही प्रसारित झाली होती. गेल्या अनेक वर्षांपासून मालवण कथामालेच्या माध्यमातून तालुकास्तरीय कथाकथन व वक्तृत्व स्पर्धांचे भव्य आयोजन त्यांनी केले आहे.
सन १९७८ मध्ये आचरे येथे ‘आनंद बालनाट्य मंडळ’ या संस्थेची स्थापना करून त्यांनी वीसहून अधिक बाल एकांकिका सादर केल्या असून त्यांना अनेक राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले आहेत. ‘रंगरंगीले छैल छबीले’, ‘मर्कट कथा’, ‘मिशी हरवली आहे’, ‘अगडम बगडम झगडा खतम’, ‘नारद झाला गारद’ या त्यांच्या एकांकिका आजही रसिकांच्या स्मरणात आहेत. त्यांच्या कार्यामुळे एक हजारहून अधिक बालकलाकारांना रंगमंच मिळाला आहे.
बाल रंगभूमीच्या कार्यासाठी त्यांना पु. ल. देशपांडे, रत्नाकर मतकरी, जयवंत दळवी, अनंत भावे, पुष्पा भावे यांसारख्या मान्यवरांकडून पुरस्कार मिळाले आहेत. यापूर्वी नाट्यतपस्वी आत्माराम सावंत पुरस्कारानेही त्यांचा गौरव झाला असून हा पुरस्कार पद्मश्री मधु मंगेश कर्णिक व ज्येष्ठ रंगकर्मी कमलाकर नाडकर्णी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला होता.
वयाची सत्तरी ओलांडल्यानंतरही व कठीण शस्त्रक्रियेनंतरही ठाकूर गुरूजींचे बालसेवेचे कार्य अखंड सुरू आहे. “माझ्या तनामनात कथामालेचे बीज रुजविणाऱ्या मालवणच्या मधु वालावलकर, ज्ञानेश देऊळकर, श्रीपाद तोंडवळकर, प्र. के. वालावलकर, श्रीपाद पराडकर व चिंतामणी विश्राम धुरी या विभूतींना हा पुरस्कार समर्पित करतो,” अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
