मालवणच्या ‘शिवराज भूषण’ महानाट्याचे डिसेंबरमध्ये व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण

Spread the love

छत्रपती शिवाजी महाराज आणि कवी भूषण यांच्या पराक्रमाची गाथा उलगडणाऱ्या ‘शिवराज भूषण’ या महानाट्याला मालवणातील चारही प्रयोगांमध्ये रसिकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला. हाऊसफुल्ल प्रयोगांच्या यशानंतर आता हे महानाट्य डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात सिंधुदुर्गात पाच प्रयोगांसह व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण करणार असल्याची माहिती श्री शिवराज मंचचे प्रमुख व निर्माते भूषण साटम यांनी पत्रकार परिषदेत दिली. जानेवारी महिन्यात या महानाट्याचे आणखी तीन प्रयोग होणार असून मालवणपासून मुंबईपर्यंत याची वैभवशाली घोडदौड सुरू राहणार आहे.

शिवराज्याभिषेक दिनी सादर झालेल्या प्रारंभीच्या चार प्रयोगांना मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर हे नाटक व्यावसायिक रंगभूमीवर नेण्याचा निर्णय घेण्यात आला. अधिक प्रभावी सादरीकरणासाठी छत्रपतींच्या अश्वाची भूमिका जिवंत करण्यासाठी विशेष अश्व खरेदी करण्यात आला असून त्याचे नाव “कृष्णा” ठेवण्यात आले आहे. या अश्वाचे नामकरण चौके येथील कार्यक्रमात करण्यात आले. डिसेंबरनंतर हे महानाट्य कुडाळ, सावंतवाडी, वेंगुर्ला, दोडामार्ग, कणकवली येथे सादर होईल, तर तिसऱ्या टप्प्यात दादर (शिवाजी मंदिर), ठाणे (गडकरी रंगायतन) आणि वाशी (विश्वनाथ भावे नाट्यगृह) येथे मुंबईकरांसाठी सादरीकरण होणार आहे.

सुमारे ६० स्थानिक कलाकारांच्या सहभागाने सादर होणारे हे नाटक सिंधुदुर्गातील हौशी रंगभूमीचा मोठा विजय असल्याचे साटम यांनी नमूद केले. “आर्थिक फायद्याचा कोणताही हेतू नसून महाराजांचे विचार जनतेपर्यंत पोहोचावेत हाच एकमेव उद्देश आहे,” असे ते म्हणाले. आगामी व्यावसायिक प्रवासाबाबत निर्माते भूषण साटम आणि दिग्दर्शक गणेश मेस्त्री यांनी आत्मविश्वास व्यक्त करत रसिकांकडून अभूतपूर्व प्रतिसादाची अपेक्षा व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *