अ.शि. दे. टोपीवाला हायस्कूल, मालवण येथील कला शिक्षिका सौ. राखी हुन्नरे उर्फ राखी देवदत्त अरदकर यांची राष्ट्रीय स्तरावर आयोजित “कला-पुष्कर-राज रंगरेखा” विशेष चित्रकला शिबिरासाठी सन्माननीय निवड झाली आहे. राज्यभरातून चित्रकलेच्या क्षेत्रात वेगळे, नाविन्यपूर्ण प्रयोग करणाऱ्या चित्रकारांसाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले असून, सौ. अरदकर यांची निवड हा मालवण व सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी अभिमानाचा क्षण आहे.
या शिबिरात सहभागी कलाकारांना जलरंग, अक्रॅलिक रंग, कॅनव्हास, हँडमेड पेपर अशा विविध माध्यमांवर काम करण्याची संधी मिळणार आहे. शिबिरात तयार होणारी सर्व चित्रे पुढील काळात मुंबईतील पुल. देशपांडे कला दालनात प्रदर्शनासाठी ठेवली जाणार आहेत.
सौ. राखी अरदकर सध्या टोपीवाला हायस्कूलमध्ये कला शिक्षिका म्हणून कार्यरत असून, त्यांनी इंडोलॉजी या विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे. याशिवाय G.D., R.D., P.Ed., A.M., M.A. यांसारख्या अनेक शैक्षणिक पदव्या प्राप्त करून त्यांनी आपले शिक्षण आणि ज्ञानवृद्धीचा प्रवास कायम ठेवला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथे होणाऱ्या विशेष कार्यशाळेसाठी त्यांना ‘प्रयोगशील चित्रकर्ती’ म्हणून निमंत्रण देण्यात आले आहे. उत्कृष्ट चित्रकलेबरोबरच त्या एक उत्तम शिक्षिका आणि समर्पित गृहिणी आहेत. अध्यापन, कला आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या यांचा समतोल साधत त्यांनी साधलेले यश इतर कला शिक्षकांसाठी प्रेरणादायी आहे.
स्थानिक कलावंत, सहकारी शिक्षकवर्ग आणि विद्यार्थ्यांकडून सौ. अरदकर यांचे मन:पूर्वक अभिनंदन करण्यात येत असून, त्यांच्या आगामी कलाप्रवासासाठी शुभेच्छा दिल्या जात आहेत.