शिवकालीन परंपरेला उजाळा; मालवण बंदरावर नारळी पौर्णिमेचे सोहळे उत्साहात

Spread the love

मालवणच्या शिवकालीन नारळी पौर्णिमेच्या निमित्ताने आज मालवण जेटीवर नारळ लढविणे स्पर्धाचा थरार आज मालवणसह जिल्हाभरातील नागरिकांनी याची देही याची डोळा अनुभवला एक… दोन नव्हे तर तब्बल पाच नारळ लढविण्याच्या स्पर्धानी सारी बंदरजेटी दणाणून सोडली

नारळ लढविण्याच्या स्पर्धांची रंगत

नारळी पौर्णिमा उत्सवानिमित्त यावर्षीही मालवण बंदर जेटीवर विविध आयोजकांच्या वतीने नारळ लढविण्याच्या स्पर्धा रंगल्या. यामध्ये सौ. शिल्पा यतीन खोत मित्रमंडळ, मालवणी संस्कृती व वारसा मंडळ, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, भाजपा यांच्या वतीने महिलांसाठी तर सतीश आचरेकर मित्रमंडळातर्फे पुरुषांसाठी नारळ लढविण्यांची भव्य स्पर्धा घेण्यात आली. चार स्पर्धांचे उदघाटन आमदार निलेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले. तर ठाकरे शिवसेनेच्या नारळ लढविणे स्पर्धेचे उदघाटन माजी आमदार वैभव नाईक यांनी केले.

ढोल ताशांच्या गजरात शिल्पा यतीन खोत मित्रमंडळाच्या स्पर्धेची रंगत

शिल्पा यतीन खोत मित्रमंडळाच्या नारळ लढविणे स्पर्धेचे उदघाटन आमदार निलेश राणे यांच्या दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी स्वराज्य ढोल पथकातर्फे महाकाल संकल्पनेवर ढोल वादन करण्यात आले. यावेळी आमदार निलेश राणे यांचा शिल्पा खोत व यतीन खोत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी आम. निलेश राणे म्हणाले, सर्वात जुनी नारळ लढविणे स्पर्धा व सर्वात जास्त गर्दी असणारी स्पर्धा म्हणजे शिल्पा यतीन खोत मित्र मंडळाची स्पर्धा आहे. शिवप्रेमी व हिंदुत्ववादी असलेल्या शिल्पा खोत यांच्या कडून आयोजित होणारी ही स्पर्धा उत्तरोत्तर वाढत राहो, हिंदूंचे सण अशाच प्रकारे मोठ्या थाटात साजरे झाले पाहिजेत, असेही आम. राणे म्हणाले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, उपनेते संजय आंग्रे, भाजपचे अशोक सावंत, धोंडी चिंदरकर, बाबा मोंडकर आदी ब इतर उपस्थित होते.

मालवणी संस्कृती व वारसा मंडळाच्या स्पर्धेत कार्यक्रमांचीही रंगत

मालवणी संस्कृती व वारसा मंडळातर्फे आयोजित महिलांसाठी नारळ लढविणे स्पर्धेचे उदघाटन आम. निलेश राणे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. या स्पर्धेला पद्मश्री परशुराम गंगावणे व टीव्ही अभिनेते विरेश कांबळी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी मंडळातर्फे आम. राणे, श्री. गंगावणे, श्री. कांबळी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी स्पर्धेबरोबरच फुगडी, नृत्य असे सांस्कृतिक कार्यक्रमही संपन्न झाले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष अरविंद मोंडकर, ऍड. अमृता मोंडकर, सौ. सिया धुरी, देवानंद लुडबे, गणेश पाडवगावकर, आर्या मुणगेकर, विद्या फर्नांडिस, प्राची माणगावकर आदी व इतर उपस्थित होते.

किनारपट्टीचा कायापालट करणार – आम. निलेश राणे

मालवण भाजप तर्फे आयोजित महिलांसाठी नारळ लढविणे स्पर्धेचे उदघाटन आमदार निलेश राणे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. यावेळी आम. निलेश राणे म्हणाले, गतवर्षी या स्पर्धेला उपस्थित होतो, आज आमदार म्हणून उपस्थित आहे, ही स्पर्धा दरवर्षी होत राहील आणि दरवर्षी मी येत राहीन, किनारपट्टी भागात गेल्या दहा वर्षात कामे झाली नाहीत, ती पाच वर्षात करायची आहेत, किनारपट्टीचा कायापालट आपण करणार आहोत, यासाठी आपण एकत्र राहून काम करूया, असेही आम. निलेश राणे म्हणाले. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनीही शुभेच्छा दिल्या.
यावेळी भाजप महिला आघाडीतर्फे आम. राणे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी भाजप व शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

सतीश आचरेकर मित्रमंडळाची मोठ्या रक्कमेची स्पर्धा

यावेळी सतीश आचरेकर मित्रमंडळातर्फे पुरुषांसाठी आयोजित नारळ लढविणे स्पर्धेचे उदघाटन आमदार निलेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेतील विजेत्याला १ लाख रुपये रक्कमेचे बक्षीस ठेवण्यात आले होते. यावेळी बोलताना आम. निलेश राणे यांनी सर्वात मोठ्या रक्कमेची स्पर्धा सातत्याने भरविल्याबद्दल सतीश आचरेकर मित्रमंडळाचे कौतुक केले. यावेळी सतीश आचरेकर यांच्या हस्ते आम. निलेश राणे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आम. राणे, दत्ता सामंत व सुदेश आचरेकर यांनी नारळ लढविण्याचा आनंद लुटला. यावेळी रोहन आचरेकर, आनंद आचरेकर यांच्यासह मित्रमंडळाचे इतर सदस्य उपस्थित होते.

ठाकरे शिवसेनेच्या स्पर्धेलाही प्रतिसाद

यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मालवण तालुका आयोजित महिलांसाठी नारळ लढविणे स्पर्धेला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या स्पर्धेचे उदघाटन माजी आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी आमदार परशुराम उपरकर, हरी खोबरेकर, बाबी जोगी, व इतर पदाधिकारी, महिला आघाडीच्या पदाधिकारी आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *