18 आणि 19 जुलैला ‘गझलांचा खजाना” महोत्सव सजणार !

Spread the love

दिवंगत गझल सम्राट पद्मश्री पंकज उधास यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘खजाना-फेस्टिव्हल ऑफ गझल्स २०२५’ १८ आणि १९ जुलैला नरिमन पॉइंट येथील ट्रायडंट हॉटेलमध्ये साजरा होणार आहे.

कॅन्सर पेशंट्स एड असोसिएशन (सीपीएए) व पेरेंट्स असोसिएशन थैलेसेमिक युनिट ट्रस्ट (पीएटीयुटी) यांच्या सहकार्याने होणाऱ्या या महोत्सवातून थॅलेसेमिया व कर्करोगग्रस्त रुग्णांसाठी निधी संकलित केला जाणार आहे.

नरिमन पॉइंट येथील ट्रायडेंट हॉटेलमध्ये झालेल्‍या पत्रकार परिषदेत याची माहिती देण्यात आली.
गेल्या २४ वर्षांपासून गझलप्रेमींच्या हृदयात स्थान निर्माण केलेल्या या महोत्सवात यंदा महान पार्श्वगायक मोहम्मद रफी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांना अभिवादन करण्यात येणार आहे. तसेच उस्ताद झाकीर हुसेन यांनाही विशेष आदरांजली अर्पण केली जाईल.

यंदा अनुप जलोटा, तलत अझीज, रेखा भारद्वाज, सुदीप बॅनर्जी, उस्मान मीर, अमीर मीर, पं. अजय पोहनकर, अभिजित पोहनकर, महालक्ष्मी अय्यर, राकेश चौरसिया, प्रतिभा सिंग बघेल यांच्यासह अनेक दिग्गज कलाकार मंच गाजवणार आहेत. पंकज उधास यांच्या पत्नी फरीदा उधास व त्यांची मुलगी नायाब यांच्याकडे या महोत्सवाची जबाबदारी आहे.

गझल गायिका रेखा भारद्वाज म्हणाल्या, खजाना महोत्सव हे केवळ संगीताचे नव्हे, तर समाजसेवेचे प्रतीक आहे. इथे गाणे गाताना मन वेगळाच आनंद अनुभवते. अनुप जलोटा म्हणाले, गेल्या २४ वर्षांत खजाना महोत्सवातून लाखो रुग्णांना मदत झाली आहे. ही परंपरा कायम राहणे हेच आमचे यश आहे. हा केवळ महोत्सव नाही, तर पंकज उधास यांच्या स्वप्नांचा विस्तार आहे. संगीताच्या माध्यमातून लोकांना मदत करणे, हा आमचा ध्यास आहे, अशी प्रतिक्रिया पंकज उधास यांच्या पत्नी फरीदा उधास यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *