
‘महाराष्ट्राचा इतिहास गौरवशाली आहे. आणि ती एक जबाबदारी देखील आहे. आपण ज्ञानेश्वरांचे, शिवरायांचे, क्रांतिज्योती सावित्रीबाईंचे आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे थेट वशंज नसलो, तरीही विचारांच्या वारश्याचे वाहक आहोत. या सर्वांनी आपल्या ज्ञानाने, त्यागाने आणि धैर्याने हे राज्य घडविले. त्याला जपणे, वाढवणे आणि पुढे नेणे हे आपले कर्तव्य आहे. महाराष्ट्रधर्म म्हणजे स्मरण रंजन नाही. तो आपला नैतिक मार्गदर्शक. आपण कोण आहोत, हे समजून घेऊन, आपल्याला काय घडवायचे आहे, ते ठरविणे, हाच महाराष्ट्रधर्म आहे,’ अशी मांडणी करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आजपासून ‘महाराष्ट्रधर्म’ विशेष पॉडकास्ट मालिकेचा प्रारंभ केला. ही मुलाखत सुप्रसिद्ध विचारवंत, संत साहित्याचे अभ्यासक – लेखक आणि जगद्गुरू तुकाराम महाराज यांचे वंशज डॉ. सदानंद मोरे यांनी घेतली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2014 ते 19 या आपल्या पहिल्या कार्यकाळात ‘मी मुख्यमंत्री बोलतोय’ हा टि.व्ही. शो केला होता. आता नवमाध्यमात लोकप्रिय अशा पॉडकास्टच्या माध्यमातून ते जनसंवाद साधणार आहेत.
पॉडकास्ट मालिकेचा प्रारंभ ‘महाराष्ट्रधर्म : पायाभरणी आणि उभारणी’ या विषयापासून झाला. आषाढी एकादशीच्या शुभमुहूर्तावर सुरू करण्यात आलेल्या ‘महाराष्ट्रधर्म’ या विशेष पॉडकास्ट मालिकेचे हे पहिले चरण होते. यात रामायणापासून ते महाभारतापर्यंत, जगाला दुःखातून मुक्त होण्याचा मार्ग दाखवणाऱ्या गौतम बुद्धांपासून ते भक्ती संप्रदायाच्या संतांपर्यंत आणि महाराष्ट्राची अध्यात्मिक पायाभरणी आणि उभारणी या विषयांवर मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी अभ्यासपूर्ण मांडणी केली. मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या समाज माध्यमावरून हे पॉडकास्ट करण्यात येत आहे.
या पहिल्याच पॉडकास्टमध्ये सहभागी झालेल्या श्रोत्यांचे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी आभार मानले आहेत. तसेच यापुढेही महाराष्ट्राच्या इतिहासात, संस्कृतीमध्ये, साहित्यामध्ये देवभूमी, संतभूमी, वीरभूमी म्हणून विचार आहे. या सर्वांचा धांडोळा घेतानाच, महाराष्ट्र हा महाराष्ट्र का आहे, याचे उत्तर शोधण्याचा प्रयत्न राहणार असल्याचेही म्हटले आहे.
आजच्या पहिल्याच पॉडकास्टमध्ये मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी महाराष्ट्राची पायाभरणी आणि उभारणीच्या अनुषंगाने मांडणी केली. ‘महाराष्ट्रधर्म हा धर्म नाही. ती आहे, एक जीवंत मुल्य संहिता. ती सांगते विवेकाने विचार करा. सेवाभावाने वागा, आणि शौर्याने उभे राहा. ज्ञानेश्वरांच्या ओव्यापासून शिवरायांच्या तलवारीपर्यंत फुल्यांच्या साहसापासून, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दृष्टीकोनापर्यंत ही साखळी कधी तुटलीच नाही. ती सतत पुढे सरकत राहिली,’ अशा मांडणीमुळे पॉडकास्टचा प्रारंभ अभ्यासपूर्ण आणि उत्कंठावर्धक झाला. त्याला मोठा प्रतिसादही लाभला.