‘२०२४ भाजपा जिंकली! कशी?’ पुस्तकाच्या मंचावर सत्ताधारी-विरोधकांची राजकीय जुगलबंदी! तुळशीदास भोईटेंच्या विश्लेषणाचं सर्वपक्षीय कौतुक!!
महाराष्ट्र विधानसभेच्या २३ नोव्हेंबर रोजी जाहीर झालेल्या निकालाची ‘२०२४ भाजपा जिंकली! कशी?’ या पत्रकार तुळशीदास भोईटे यांच्या पुस्तकाचं प्रकाशन आणि मुक्तपीठ सन्मान कार्यक्रम शुक्रवारी मुंबईत संपन्न झाला. हा कार्यक्रम म्हणजे सत्ताधारी आणि विरोधी नेत्यांच्या वैचारिक जुगलबंदीचा विचारमंच ठरला. कार्यक्रमाचे अध्यक्ष एबीपी माझा आणि एबीपी न्यूजचे मुख्य संपादक राजीव खांडेकर यांनी पत्रकार आणि पुस्तकाचे लेखक तुळशीदास भोईटे यांनी ते घडवून दाखवल्याचा खास उल्लेख केला. ते म्हणाले, “जे राजकारणात खूपच अपवादानं घडतं ते घडलं, वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे मोठे नेते एकाच मंचावर एकत्र आले. त्यातून पुस्तकात आकडेवारीसह जे निष्पक्ष विश्लेषण केलं आहे तेच प्रत्यक्षात धोरण असल्याचं दिसून येतं.” मंचावर उपस्थित विरोधकांपैकी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते भास्कर जाधव यांनी ‘२०२४ भाजपा जिंकली! कशी?’ या पुस्तकाच्या नावावरून भाजपावर हल्लाबोल करत भाजपा जिंकलीच कशी असा रोखठोक प्रश्न विचारत त्यांनी मुद्दे मांडले, तर भाजपाचे मुंबई अध्यक्ष, कॅबिनेट मंत्री आशिष शेलार यांनी पुस्तकाच्या नावावरून केला गेलेला हल्ला परतवताना मुळात पुस्तकातील नाव प्रत्यक्षात काय सांगतं, त्यावर स्पष्ट शब्दांमध्ये मुद्देसुद भाष्य केलं.
ग्रंथाली प्रकाशनाचे ट्रस्टी सुदेश हिंगलासपूरकर यांनी पुस्तकाच्या प्रकाशनामागील भूमिका सांगितली. त्यांनी ग्रंथालीच्या साहित्य क्षेत्रातील सक्रियतेची थोडक्यात माहिती दिली.
‘२०२४ भाजपा जिंकली! कशी?’ पुस्तकाचे लेखक तुळशीदास भोईटे यांनी भूमिका मांडताना २३ नोव्हेंबर २०२४रोजी विधानसभा निवडणुकीचे निकाल लागत असतानाच ‘भाजपा जिंकली! कशी?’ हा प्रश्न मनात आल्याचं सांगत तोच प्रश्न मोठे नेते ते सामान्य सर्वांच्याच मनात घोळत असल्याचं जाणवल्याचा उल्लेख केला. त्या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठीच या पुस्तकाच्या माध्यमातून प्रयत्न केल्याचं सांगितलं. केवळ एक प्रकरण वाचून मत बनवू नका तर सर्व २३ प्रकरणं डोळ्यानं आणि डोक्यानं वाचत मग त्यावर भाष्य करा, असंही आवाहन त्यांनी केलं. तसंच पुस्तकात काही चुका राहिल्या असतील तर त्या पुढील आवृत्तीत सुधारण्याची ग्वाही त्यांनी दिली.
राजीव खांडेकर यांनी देशातील पहिल्या निवडणुकीपासूनचे अनुभव सांगत मतदान प्रक्रियेवर भाष्य केलं. त्यातून लोकशाही कशी विकसित होत गेली ते त्यांनी अभ्यासपूर्वक मांडलं. या निवडणुकीच्या निकालाचं ‘२०२४ भाजपा जिंकली! कशी?’ या पुस्तकात केलं गेलेलं विश्लेषण हे खूपच अभ्यासपूर्ण, आकडेवारीसह आणि सखोल असल्याबद्दल त्यांनी कौतुक केलं. समकालिन घडामोडींची अभ्यासपूर्ण मांडणी पुस्तकांमधून करण्याचं स्वागत करत त्यांनी भविष्यातील इतिहास लेखनासाठी उपयोगी ठरेल, असं मत मांडलं. तुळशीदास भोईटेंच्या निष्पक्षतेचं कौतुक करतानाच सध्या एकांगी पत्रकारिता करण्याऐवजी अशी स्वतंत्र पत्रकारिता करणाऱ्यांसाठी खडतर काळ असल्याचंही निरीक्षण त्यांनी मांडलं. असं करणाऱ्यांना साथ दिली जात नाही, त्यांची अवस्था लोंबकळती केली जाते, हे स्पष्ट शब्दात त्यांनी दाखवलं. ‘२०२४ भाजपा जिंकली! कशी?’ या पुस्तकातील या निष्पक्ष विश्लेषणामुळे तुळशीदास भोईटे यांनाही अशा अवस्थेला तोंड द्यावं लागू शकतं. मात्र त्यांनी तरीही त्यांनी ती हिंमत दाखवल्याचं राजीव खांडेकर यांनी कौतुक केलं.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ‘२०२४ भाजपा जिंकली! कशी?’ या पुस्तकाला सध्याच्या गढुळलेल्या वातावरणाला स्वच्छ करणारी तुरटी असल्याचं म्हटलं. जे आहे ते वास्तव मांडण्याचं काम तुळशीदास भोईटे यांनी आपल्या आकडेवारीसह मांडणीतून केल्याचं सांगत त्यांनी भाजपा जिंकलीच कशी हा प्रश्न सामान्यांच्या मनात असल्याचं बजावलं. त्यांनी पुस्तकातील व्होट जिहादचं नॅरेटिव्ह प्रत्यक्षात कसं आहे ते मालेगाव, ईशान्य मुंबईच्या आकडेवारीसह मांडण्याच्या प्रकरणाचा खास उल्लेख केला.
शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी पुस्तकातील दाखले देत भाजपावर हल्ला चढवला. त्यांनी अशा विश्लेषणांची लोकशाहीत आवश्यकता असल्याचं मांडलं. शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी पुस्तकातील दाखले देत भाजपावर हल्ला चढवला. त्यांनी ‘२०२४ भाजपा जिंकली! कशी?’ या पुस्तकातील विश्लेषणांची लोकशाहीत आवश्यकता असल्याचं मांडलं. सध्या मतदारांना कळतच नाही मत कुणाला दिलं आणि कुणाला पोहचलं. त्यात आता पक्ष, आमदार, खासदार विकत घेण्याच्या राजकारणावर हल्ला चढवला.
कॅबिनेट मंत्री आशिष शेलार यांनी पुस्तकाच्या ‘२०२४ भाजपा जिंकली! कशी?’ या नावावरून भास्कर जाधव, हर्षवर्धन सकपाळ यांनी भाजपावर जो हल्लाबोल केला त्याला वेगळ्या पद्धतीनं उत्तर दिलं. ज्यांनी पुस्तकाचं नाव चुकीचं वाचून चुकीचं भाष्य केलं त्यांना समजवून त्यांच्या ज्ञानात काही भर पडणार नाही. जे बाळबोध वाचतील त्यांनाही गुपीत सांगण्यात अर्थ नाही. ते म्हणाले सध्या भाजपावर बोलणाऱ्यांची संख्या जास्त आहेत. प्रत्येक राजकीय पक्ष आपल्या विचारांनुसार बोलत असतो. मात्र पुस्तकावर बोलण्याऐवजी इतर राजकीय बोलणं हे तुळशीदास भोईटेंच्या पुस्तकावर अन्याय ठरेल.
भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रेम शुक्ल यांनी तुळशीदास भोईटेंच्या ‘२०२४ भाजपा जिंकली! कशी?’ या पुस्तकातील काही भागाचा उल्लेख करत ते पुस्तक हिंदी आणि इंग्रजीतही भाषांतर करून प्रकाशित करणं गरजेचं असल्याचं मत मांडलं. ईव्हीएमपुरताच विचार करत आरोप करणाऱ्या राहुल गांधी यांना इंग्रजी पुस्तकाची प्रत भेट देण्याचंही ते बोलले.
मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण यांनी तुळशीदास भोईटे यांचं ‘२०२४ भाजपा जिंकली! कशी?’ पुस्तक निवडणूक अभ्यासासाठी संदर्भग्रंथ ठरेल अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यांनी मुक्तपीठ सन्मान उपक्रमासाठी भोईटेंचं खास कौतुक केलं. केवळ पडद्यावर दिसणारे अँकर, रिपोर्टर नाही, तर पीसीआर, ग्राफिक्स, प्रोडक्शन, इनपुट, आऊटपुट या टीममधील सहकाऱ्यांचा आणि बीडमधील निर्भीड पत्रकार, रत्नागिरीतील पत्रकाराच्या हत्याप्रकऱणातील लढवय्या कार्यकर्त्याचा सन्मान हे वेगळेपण भावल्याचं सांगितलं. तसं करून मुक्तपीठने संस्थात्मक कार्य केलं असल्याचा गौरव त्यांनी केला.
मुंबई विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. दीपक पवार यांनी कमी शब्दांमध्ये मात्र तडाखेबंद मत मांडलं. हेरंब कुलकर्णींच्या अहवालाच्या आधारे तुळशीदास भोईटे यांनी करोडपती-रोडपतींच्या निवणुकीकीत सहभागाचा, विजय-पराजयाचं विश्लेषण करत त्यांनी अर्थबळाच्या वाढत्या प्रभावाचा धोका दाखवला. तसंच सत्ताधारी महायुतीत सत्तेसाठी भाजपाच्या शेजारी बसलेल्यांना भविष्यात मोठा धोका असल्याचं ते म्हणाले.
या कार्यक्रमास सुप्रसिद्ध गझलनवाझ भिमराव पांचाळे खास उपस्थित होते, त्यांचा खास सत्कार करण्यात आला. त्यांनी राजकीय विषयावरील कार्यक्रम हा त्यांच्या स्वभावाला साजेसा नसतानाही तुळशीदास भोईटेंवरील प्रेमापोटी आल्याचं सांगितलं. शिवसेनेचे कोकणातील नेते निलेश सांबरे, पत्रकार संघाच्या विश्वस्त राही भिडे, विनोद पोखरकर, काँग्रेस नेते धनंजय शिंदे, भाजपाचे माध्यम उपप्रमुख अजित चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते अक्षय शिंदे, डिजिटल तज्ज्ञ आशुतोष रापतवार, गुजरात फर्स्टचे पत्रकार राहुल बौसकर, मनोज भोईर,
टीव्हीजेएचे सरचिटणीस पंकज दळवी, जनसंपर्क तज्ज्ञ गितांजली दळवी आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुप्रसिद्ध अँकर भूषण करंदीकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रंथालीचे संपादकीय तज्ज्ञ अरुण जोशी, कार्यक्रम समन्वयक धनश्री धारप, आर्या, योगिता, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. विजय कदम, विवेकानंद युथ कनेक्टचे डॉ. राजेश सर्वज्ञ, प्रथमेश भोईटे, मुंबई मराठी पत्रकार संघाच्या स्वाती घोसाळकर आणि अन्य सहकाऱ्यांनी खास योगदान दिलं. अॅड. जयेश वाणी यांनी कार्यक्रमाच्या संयोजनात खूप महत्वाची जबाबदारी पार पाडली.