राजकोट किल्ल्यावर भव्य आरमार संग्रहालयासह प्रदर्शन, पर्यटन केंद्र उभारणार 

Spread the love

‘भारतीय नौदलाचे जनक’ छत्रपती शिवाजी महाराज यांचे धैर्य, शौर्य, पराक्रम, अलौकिक कार्याची ओळख नव्या पिढीला व्हावी. छत्रपती शिवाजी महाराज यांनी देशातले पहिले आरमार स्थापन करुन दाखवलेली दूरदृष्टी सर्वांना कळावी. त्यातून प्रेरणा घेऊन भावी पिढी नौदल, नौवहनसेवेत यावी, यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांचा ८३ फुट उंचीचा भव्य पुतळा सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मालवण तालुक्यातील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आला आहे. आता त्याच परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराची यशोगाथा सांगणारे भव्य संग्रहालय, प्रदर्शन आणि पर्यटन केंद्र उभारण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या ८३ फुट उंच पुतळ्यामुळे समुद्रकिनाऱ्यालगत असलेल्या राजकोट किल्ल्याला वेगळं महत्त्व प्राप्त झाले आहे. हा किल्ला पाहण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांची संख्या भविष्यात वाढू शकते. या पर्यटकांना छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्याकाळात स्थापन केलेल्या आरमाराचा इतिहास कळावा, माहिती मिळावी, छत्रपतींच्या आरमारापासून आजच्या आधुनिक नौदलाच्या प्रवासाचे दर्शन घडावे, यासाठी राजकोट किल्ला परिसरात भव्य आरमार-नौदल संग्रहालय उभे राहण्यासह परिसराचा पर्यटनाच्यादृष्टीने विकास करण्याची गरज आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने यासंबंधीच्या प्रस्तावाचा अभ्यास करुन पुढील कार्यवाही करावी, असे निर्देशही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीत दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *