उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते घोणे काष्ठशिल्प म्युझियम आणि हॉटेल ‘आजीची आठवण’चा भव्य शुभारंभ   ; ग्लोबल कोकणच्या आर्ट व्हिलेजची ऐतिहासिक सुरुवात

Spread the love

कोकणातील कला, संस्कृती आणि पर्यटनाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण टप्पा ठरलेल्या ‘ग्लोबल कोकण आर्ट व्हिलेज’च्या उपक्रमाची आणि ‘घोणे काष्ठशिल्प म्युझियम’ व ‘हॉटेल आजीची आठवण’ या दोन महत्त्वपूर्ण प्रकल्पांची भव्य सुरुवात आज राज्याचे उपमुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडली. शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने रायगड जिल्ह्यात आलेले उपमुख्यमंत्री शिंदे यांनी या नव्या केंद्राला पहिल्याच दिवशी भेट देऊन या उपक्रमांमधील कला आणि प्रयत्नांचे विशेष कौतुक केले.

कोकणातील सुप्रसिद्ध काष्ठशिल्पकार स्वर्गीय रमेश घोणे यांच्या आयुष्यभराच्या कलायात्रेचा संचित असलेले ‘घोणे काष्ठशिल्प म्युझियम’ यांचे आज उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते उदघाटन सोहळा पार पडला. कोणतेही जिवंत झाड न तोडता, नैसर्गिकरित्या सुकलेल्या लाकडातून घडवलेल्या शिल्पांचे हे म्युझियम जागतिक दर्जाच्या कलाकृतींनी सजलेले आहे. या शिल्पांमध्ये झाशीची राणी, लोकमान्य टिळक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, वासुदेव बळवंत फडके आणि सरखेल कानोजी आंग्रे यांसारख्या असंख्य राष्ट्रपुरुषांचे प्रभावी दर्शन घडते. या नव्या कलाकेंद्रात ‘कोकण रत्न प्रदर्शन’ हे देखील कायमस्वरूपी उभारण्यात आले आहे, ज्यामध्ये कोकणाच्या मातीतून जन्मलेल्या जगविख्यात व्यक्तिमत्वांविषयी माहिती आणि त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला आहे.

या कार्यक्रमात ग्लोबल कोकणचे संस्थापक संजय यादवराव यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे एक महत्वपूर्ण मागणी केली — कोकणातील असंख्य राष्ट्रपुरुषांच्या योगदानाचा गौरव म्हणून मुंबई-गोवा महामार्गाला ‘स्वराज्य भूमी कोकण महामार्ग’ असे नाव देण्यात यावे. या मागणीचा विचार करण्याचे आश्वासन मा. उपमुख्यमंत्री यांनी दिले.

या प्रसंगी ग्लोबल कोकणच्या वतीने उपमुख्यमंत्र्यांसमवेत कल्याण नगरसेवक प्रशांत काळे, हर्षवर्धन पालांडे, अंबरनाथचे नगरसेवक सुभाष साळुंखे आदींनी कोकणातील उद्योजकता विकास, पर्यटन संधी, आणि रोजगार निर्मितीबाबत चर्चा केली. ‘रायगड पर्यटन शिवतीर्थाटन’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमास शासनाची साथ मिळावी यासाठी विनंती करण्यात आली असून, याला उपमुख्यमंत्री यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *