यंदाचे ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन तब्बल ३२ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर साताऱ्याच्या मातीत रंगणार आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पुण्यात पार पडलेल्या बैठकीत संमेलनाच्या स्थळासाठी साताऱ्याची एकमुखाने निवड करण्यात आली.
महामंडळाच्या स्थळ निवड समितीने ५ ते ७ जूनदरम्यान विविध इच्छुक स्थळांना भेटी दिल्या. त्यानंतर साताऱ्याला संमेलन देण्याचा निर्णय आजच्या बैठकीत औपचारिकपणे घोषित करण्यात आला.
महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी ही माहिती दिली. त्यांच्या समवेत उपाध्यक्ष गुरुय्या स्वामी, कार्यवाहक सुनिता राजे पवार, कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी आणि विविध घटक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. साताऱ्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेला आणि मावळा फाउंडेशनला या संमेलनाचे आयोजन करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
साताऱ्याच्या भूमीत हे चौथे संमेलन होणार आहे. यापूर्वी १९०५ साली रघुनाथ पांडुकर करंदीकर यांच्या अध्यक्षतेखाली, १९६२ मध्ये न. ग. गाडगीळ यांच्या नेतृत्वाखाली आणि १९९३ मध्ये विद्याधर गोखले यांच्या अध्यक्षतेखाली अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलने साताऱ्यात पार पडली होती. त्यामुळे यंदाच्या संमेलनाला ऐतिहासिक संदर्भ आणि उत्सवाचे स्वरूप लाभणार आहे. हे संमेलन छत्रपती शाहू स्टेडियममध्ये होणार असून, याठिकाणी याआधी १९९३ मधील ६६वे संमेलन देखील पार पडले होते. १४ एकर क्षेत्रफळ असलेल्या या स्टेडियममध्ये मुख्य सभामंडप, दोन उपमंडप, ग्रंथ प्रदर्शन, कवी गझल कट्टा आणि भोजन व्यवस्थेची तयारी होणार आहे. स्टेडियमच्या गॅलरीत सुमारे २५,००० प्रेक्षकांची बसण्याची सोय आहे. तसेच शेजारील पोलिस परेड ग्राउंडची ८ एकर जागा वाहनतळासाठी वापरण्यात येणार आहे.
हे ठिकाण सातारा बसस्थानकाच्या जवळ असल्यामुळे राज्याच्या विविध भागांतून येणाऱ्या साहित्यप्रेमींसाठी ही अत्यंत सोयीस्कर जागा ठरणार आहे. संमेलनाची सगळी तांत्रिक, सांस्कृतिक व प्रशासनिक तयारी मार्गी लावण्यासाठी एक मार्गदर्शन समितीही नेमण्यात आली आहे. या समितीत प्रा. मिलिंद जोशी, गुरुय्या स्वामी, सुनिता राजे पवार, विनोद कुलकर्णी, प्रदीप दाते, दादा गोरे आणि डॉ. उज्ज्वला मेहेंदळे यांचा समावेश आहे. शब्दप्रेम, साहित्य, विचारमंथन, गझल, कविता आणि विद्वानांच्या चर्चांनी सजलेले हे संमेलन साताऱ्याच्या सांस्कृतिक परंपरेला नवा उजाळा देणार असून राज्यभरातून हजारो साहित्यिक, कवी, लेखक आणि वाचक याठिकाणी उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे.