छत्रपती शिवाजी महाराज यांनी राजाश्रय दिलेले कवी भूषण यांच्या जीवनावर आणि त्यांनी लिहिलेल्या शिवराज भूषण या काव्यावर आधारित श्री शिवराज मंच मालवण यांनी निर्मित केलेल्या आणि मालवणमधील कलाकारांनी आपल्या अभिनयातून साकारलेल्या ‘शिवराज भूषण’ या महानाट्याचा शुभारंभाचा प्रयोग मालवणातील मामा वारेरकर नाट्यगृहात सादर झाला. या प्रयोगाला नाट्य रसिकांनी मोठी गर्दी करत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या महानाट्याचा शुभारंभ आमदार निलेश राणे यांच्या हस्ते होऊन त्यांनी या महानाट्यासाठी कलाकारांनी घेतलेल्या मेहनतीचे कौतुक करत या महानाट्याच्या पुढील वाटचालीस आवश्यक ती मदत आपण करू, अशी ग्वाही दिली.
शिवराज्याभिषेक दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित शिवराज भूषण या महानाट्याचा शुभारंभ प्रसंगी शिवशंभु मंचचे महाराष्ट्र प्रांत संयोजक सुधीर थोरात, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, रुपेश मोरे, शिवव्याख्याते पंकज भोसले, किल्ले विजयदुर्ग समितीचे अध्यक्ष राजीव परुळेकर, किल्ले सिंधुदुर्ग प्रेरणोत्सव समितीचे अध्यक्ष गुरुनाथ राणे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघांचे लवू महाडेश्वर, शिवसेना उपनेते संजय आंग्रे, मालवण नगरपालिका मुख्याधिकारी संतोष जिरगे, निर्माते भूषण साटम, नाटकाचे लेखक रणजित हिर्लेकर, दिग्दर्शक गणेश मेस्त्री, भाऊ सामंत, समीर शिंदे, संजय शिंदे आदी व इतर उपस्थित होते.
यावेळी आमदार निलेश राणे, सुधीर थोरात यांच्यासह पंकज भोसले, लेखक रणजित हिर्लेकर, दिग्दर्शक गणेश मेस्त्री, शिवप्रेमी सौ. शिल्पा खोत, हेमंत कोळंबकर यांचा सत्कार करण्यात आला. तर किल्ले विजयदुर्ग प्रेरणोत्सव समिती व किल्ले सिंधुदुर्ग प्रेरणोत्सव समिती यांच्या वतीने निर्माते भूषण साटम यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
यावेळी भूषण साटम यांनी नाटकाविषयी माहिती देताना कवी भूषण यांचे शिवराज भूषण हे काव्य महाराष्ट्रात काहीसे दुर्लक्षित राहिले, हे काव्य व त्यात मांडलेला शिवरायांचा इतिहास सर्वांसमोर आणण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत, असे सांगितले.
यावेळी आम. निलेश राणे म्हणाले, मालवणातील कलाकारांनी एकत्र येऊन केलेले महानाट्य कौतुकास्पद आहे. शिवरायांच्या इतिहासातील अनेक गोष्टी आहेत, ज्यावर संशोधन व्हायचे बाकी आहे, केवळ महाराष्ट्रातच नाही तर इतर अनेक राज्यातील शिवरायांचा इतिहास समोर आलेला नाही, इतिहासातील अनेक दस्तऐवज अजूनही बाकी आहेत. हा इतिहास व दस्तऐवज समोर आणण्यासाठी आपण सांस्कृतिक विभागाशी पत्र व्यवहार करणार आहोत, असेही आम. राणे म्हणाले.
यावेळी सुधीर थोरात म्हणाले, भारतात छत्रपती शिवाजी महाराजांमुळे हिंदू संस्कृतीचे रक्षण झाले. शिवकाळातील समकालीन कवी भूषण यांनी लिहून ठेवलेला इतिहास महानाट्याच्या रूपाने समोर येतोय, त्यासाठी सर्व कलाकारांचे कौतुक आहे, असेही थोरात म्हणाले. सूत्रसंचालन अक्षय सातार्डेकर यांनी केले.