राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुक्ताईनगर येथील कोथळी गावातील संत मुक्ताबाई मंदिरात जाऊन दर्शन घेतले. यानंतर पंढरपूरकडे प्रस्थान करणाऱ्या संत मुक्ताबाई पालखी सोहळ्याचा शुभारंभ करत त्यांनी पालखीचे पूजन केले आणि स्वतः पालखीचे सारथ्य करून या ऐतिहासिक अध्यात्मिक परंपरेत सहभाग घेतला.
पालखीचे सारथ्य केल्यानंतर बोलताना उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “वारकरी परंपरा ही आपल्या महाराष्ट्राची अध्यात्मिक आणि सांस्कृतिक ओळख आहे. आज आपल्याला संत मुक्ताबाई यांच्या पालखीचे सारथ्य करायला मिळाले, पालखी वाहण्याची संधी मिळाली. आज मला ही सेवा मिळणे हे अत्यंत भाग्याचे व गौरवाचे क्षण आहेत. संत मुक्ताबाई, सर्व संत, आणि विठ्ठल चरणी एकच प्रार्थना – चांगला पाऊस पडू द्या, शेती बहरू द्या, शेतकरी सुखी होऊ द्या आणि संपूर्ण राज्य समृद्ध होऊ द्या.”
पंढरपूर वारी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या सर्व पालख्यांच्या सुरक्षिततेसाठी शासन स्तरावर आवश्यक ती तयारी करण्यात आली असल्याची माहितीही उपमुख्यमंत्र्यांनी दिली. त्यांनी सांगितले की, “सर्व पालखी प्रमुखांची बैठक शासनाने घेतली असून त्यामध्ये सोहळ्याचे वेळापत्रक, वाहतूक व्यवस्थापन, वैद्यकीय सुविधा, पालखी तळांवरील आवश्यक सोयी-सुविधा आणि सुरक्षेची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. याशिवाय महिलावर्गासाठी स्वतंत्र व्यवस्था व त्यांच्या सुरक्षिततेसाठी अतिरिक्त उपाययोजना केल्या जात आहेत.”
वारकरी संप्रदायाचे जतन आणि संवर्धन हे शासनाचे कर्तव्य असल्याचेही उपमुख्यमंत्री शिंदे यांनी नमूद केले. पालखी मार्गावरील ठिकाणी आरोग्य तपासणी शिबिरे, स्वच्छतागृहे, पिण्याच्या पाण्याची सुविधा, स्नानगृहे व्यवस्था यासारख्या गोष्टींचे काटेकोर नियोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मुक्ताईनगर येथून प्रस्थान केलेली संत मुक्ताबाईंची पालखी पुढे पंढरपूरकडे प्रस्थान करत असून तापी तिरा पासून चंद्रभागेच्या तिरापर्यंत जाणारी ही महाराष्ट्रातील सर्वाधिक अंतराची पालखी आहे.पालखीच्या प्रत्येक टप्यावर प्रशासन सज्ज असून, राज्य सरकार वारकरी संप्रदायाच्या सेवेसाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली.