अयोध्येतील श्रीराम मंदिरात गुरुवारी ‘राम दरबार’ची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. गर्भगृहावरील पहिल्या माळ्यावर राम दरबारची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे.या वेळी राम दरबार आणि आठ विग्रहांची प्राणप्रतिष्ठा यानिमित्त उत्तर प्रदशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे ही या कार्यक्रमात सहभागी झाले होते. हा सोहळा ‘गंगा दशहरा’ या तिथीला करण्यात आला.
हिंदू पंचांगानुसार हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. हिंदू धर्मग्रंथांनुसार, याच दिवशी राजा भगीरथ यांच्या तपश्चर्येने प्रेरित होऊन पवित्र गंगा नदी महादेवांच्या जटेतून पृथ्वीवर अवतरली होती. या वेळी मुख्य राम दरबारव्यतिरिक्त, राम मंदिर संकुलातील अन्य आठ मंदिर परिसरातदेखील अभिषेक करण्यात आला.
श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने दिलेल्या माहितीनुसार, सकाळी ६.३० वाजता यज्ञ मंडपात पूजा करून मूर्तीचा अभिषेक करण्यात आला. त्यानंतर सकाळी ९ वाजता यज्ञ झाल्यानंतर सर्व मंदिरांमध्ये एकाच वेळी विधी सुरू झाले. ज्या देवतांना अभिषेक करण्यात आला.
त्यात श्री राम दरबार (मध्यवर्ती प्रतिष्ठापना), शेषावतार, ईशान्य कोपऱ्यात (ईशान) भगवान शिव, आग्नेय कोपऱ्यात (अग्नि) भगवान गणेश, दक्षिणेकडील कोपऱ्यात भगवान हनुमान, नैऋत्य कोपऱ्यात सूर्यदेव,उत्तर-पश्चिमेकडे (वायव्य) देवी भगवती आणि उत्तरेकडील कोपऱ्यात देवी अन्नपूर्णा यांचा समावेश आहे. सोहळ्यात देशातील विविध भागांतून आलेल्या धार्मिक विद्वानांच्या उपस्थितीत वैदिक परंपरेनुसार हा सोहळा साजरा करण्यात आल्याची माहिती ट्रस्टचे विश्वस्त अनिल मिश्रा यांनी दिली.