छत्रपती शिवाजी महाराजांचा 352 वा शिवराज्याभिषेक सोहळा आज दुर्गराज रायगडावर संपन्न झाला. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समिती आणि दुर्गराज रायगड यांच्या वतीने शिवराज्याभिषेक सोहळ्याचे अप्रतिम आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यास लाखोंच्या संख्येत शिवप्रेमींनी कालपासून रायगडावर गर्दी केली आहे.
शिवकालीन मर्दानी व साहसी खेळांनी वातावरण शिवमय झाले होते. आज सकाळपासूनच शिवप्रेमींची गर्दी पाहायला मिळाली. सालाबादप्रमाणे छत्रपती युवराज संभाजी राजे व छ. शहाजी राजे यांच्या हस्ते शिवपूजन व दुग्धभिषेक करण्यात आला. यावेळी महाराष्ट्रातील शाहिरांनी पोवाडे सादरीकरण करून वातावरण निर्मिती केली.
यावेळी घोषणांनी किल्ले रायगड दणाणून निघाला. किल्ले रायगडावर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील व देशमुख कुटुंब हे देखील रायगडावर छत्रपती शिवरायांच्या चरणी नतमस्तक झाले. शिवज्याभिषेक दिन सोहळ्याच्या पूर्वसंध्येला राजमाता जिजाऊ यांच्या पाचाड येथील समाधीला शिवभक्तांनी अभिवादन केले. हिंदवी स्वराज्याच्या राजधानीत पोवाड्यांचा निनाद घुमू लागला असून, शिवस्तुतीने डफ कडाडले. राज्याभिषेक दिन सोहळ्याच्या निमित्ताने किल्ले रायगडावर आज शिवकाळ अवतरला आहे.