श्री क्षेत्र टेरव येथे भवानी मातेचा गोंधळ शुक्रवार १३ जून, २०२५ रोजी संपन्न होणार

Spread the love

!श्री क्षेत्र टेरव येथे कुलस्वामिनी श्री भवानी मातेचा मंगलमय गोंधळ सोहळा रूढी परंपरेनुसार शुक्रवार दिनांक १३ जून, २०२५ रोजी मृग नक्षत्रात जल्लोषात व आनंदान संपन्न होणार आहे. भवानी माता ही महाराष्ट्राचे व कदम कुळांचे कुलदैवत असून ही देवता सुख, समृद्धी, सौभाग्य व स्वास्थ देणारी असून दुःखाचा नाश करणारी तसेच इच्छापूर्ती करणारी देवता आहे. श्री क्षेत्र तुळजापूर येथे भवानी मातेच्या पूजेचा मान कदम कुळाचा असून त्यांना भोपे असे संबोधले जाते.

जसे वैष्णवाच्यांत भजन – कीर्तन, हरिनाम सप्ताह साजरे होतात, तसेच देवीचा, खंडोबाचा, ज्योतिबाचा गोंधळ, जागर करण्याचा अनेक कुळांचा कुलाचार आहे. ९६ कुळांपैकी ७२ कुळांची कुलस्वामिनी श्री भवानी माता आहे. गोंधळ हा भवानी मातेचा मुख्य व महत्वाचा धार्मिक विधी आहे.

देवस्थानच्या पुजाऱ्यानी पूजेची मांडणी व घट स्थापित केल्यावर मानकऱ्यांच्या हस्ते पूजा करण्यात येईल. त्या नंतर दिवट्या पाजळून घटाच्या भोवती पाच प्रदक्षिणा घालून ‘भैरी – भवानीचा गोंधळ मांडीला, गोंधळाला यावे, उदो -उदो -उदो’ असा उदघोष करण्यात येईल. परंपरेनुसार हा गोंधळ, गोंधळी न घालता श्री क्षेत्र टेरव गावातील कदम घालतील.

कुलस्वामिनी श्री भवानी मातेस गाऱ्हाणे घालून मंदिराच्या पूर्वेस आवाराबाहेर दक्षिणेकडे तोंड करून देवीचे देणे-मागणे देण्यात येईल. विधिवत पूजा-अर्चा संपन्न झाल्यावर महाप्रसादाचे वाटप करण्यात येईल.

दुसऱ्या दिवशी मंदिर स्वच्छ करून उद्यापनासह देवीला अभिषेक करण्यात येईल व अशा प्रकारे गोंधळ ह्या धार्मिक विधीची सांगता होईल.

गोंधळ या भवानी मातेच्या मुख्य व आवडत्या मंगल उत्सवात सर्वांनी अगत्याने उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घ्यावा व उत्सवाचा आनंद द्विगुणित करावा अशी विनंती टेरव ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *