महाराष्ट्राचे कुलदैवत दख्खनचा राजा श्री जोतिबा मंदिर विकास आराखड्याची सुरुवात वृक्षारोपणाने होत असून विकास आराखडा अंमलबजावणीसाठी शासन पूर्णपणे पाठीशी असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालेल्या ऑनलाइन उद्घाटन सोहळ्यात केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी ऑनलाइन पद्धतीने उपस्थित होते. कोल्हापूर जिल्ह्यातील वाडी रत्नागिरी येथे राष्ट्रीय महामार्ग आणि जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त प्रयत्नातून ‘दख्खन केदारण्य’ वृक्षारोपण कार्यक्रम झाला.
वाडी रत्नागिरी डोंगर परिसरातील तीस एकर क्षेत्रामध्ये केदार विजय ग्रंथात नोंद असलेल्या दहा हजार वेगवेगळ्या भारतीय झाडांची लागवड करून दुर्मिळ ‘दख्खन केदारण्य’ साकारत आहे. आपल्या इतिहासामध्ये, संस्कृतीमध्ये आणि आपल्या आस्थांमध्ये निसर्गाला सर्वाधिक महत्त्व दिले आहे. आपल्या सर्व देव-देवता निसर्गाशी साधर्म्य राखणारे आणि निसर्गाचे संवर्धन करणाऱ्या आहेत.
आमदार डॉ. विनय कोरे यांनी चांगल्या प्रकारे मंदिर व परिसर विकास आराखडा तयार करून घेतला असून २५९ कोटी रुपयांच्या कामाला नुकतीच राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. यामध्ये प्रमुख उद्देश हा जोतिबा डोंगर हिरवागार करणे आहे. आराखड्याची अंमलबजावणी करीत असताना आवश्यक निधी नियोजन विभागाकडूनच मिळावा अशी मागणी आहे. ती येत्या काळात पूर्ण करू. विकास आराखड्याची अंमलबजावणी प्राधिकरणामार्फतच होण्यासाठी लवकरच प्राधिकरण स्थापनेसही मंजुरी देऊ.