कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नावीन्यता विभागाच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधत राज्यभरातील १०९७ औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आयटीआय) ‘पंचपरिवर्तन‘ संकल्पनेवर आधारित व्याख्यानमालेची सुरुवात झाली.
या उपक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष व्हिडिओ संदेशाद्वारे करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, इतिहासाची जाणीव आणि जबाबदार नागरिकत्वाचे मूल्य रुजवणे, हा या कार्यक्रमाचा उद्देश असल्याचे कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले.
सोलापूर येथील जिल्हा व्यवसाय शिक्षण कार्यालय व महात्मा बसवेश्वर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे ‘पंचपरिवर्तन‘ व्याख्यानमाला उदघाटन कार्यक्रमास मंत्री श्री.लोढा उपस्थित होते.
मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले, सर्वत्र छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन सोहळा मोठ्या उत्साहाने व आनंदाने साजरा केला जात आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी लोककल्याणकारी आदर्शवत अशी राज्यकारभार पद्धत राबवली. त्याच पद्धतीच्या अवलंब करून आपले राज्य शासनही राज्यकारभार करत आहे. समाजातील प्रत्येक विद्यार्थी, नागरिक व पालक यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचा व आदर्शांचा आपल्या जीवनात अंगीकार करावा.
शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून शिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांनी नोकरी किंवा उद्योग या दोन्ही पर्यायाचा विचार केला पाहिजे. स्वतःचा उद्योग उभारून त्या उद्योगातून इतरांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली पाहिजे. तसेच पंचपरिवर्तन हा विषय प्रत्येक व्यक्तीने समजून घेतला पाहिजे असेही आवाहन देखील श्री.लोढा यांनी केले.