भरतनाट्यम आणि मराठी भक्तिगीतांचा अद्वितीय संगम; ‘भक्तीरंग’ हा पारंपरिक नृत्याविष्कार आज मालवणमध्ये

Spread the love

मालवण : भारतीय सांस्कृतिक परंपरेतील सर्वात नाजूक, अभिजात आणि भक्तीमय असा भरतनाट्यम आणि त्यासोबत मराठी भक्तिगीतांचा दिव्य संगम—हा अद्वितीय अनुभव देणारा ‘भक्तीरंग’ हा नृत्याविष्कार आज सायंकाळी भरड, मालवण येथील श्री दत्त मंदिरात रसिकांसमोर सादर केला जाणार आहे.

भरतनाट्यम नृत्यशैली, संगीत आणि भक्तीभाव यांनी परिपूर्ण अशी ही प्रस्तुती श्री दत्तगुरूंच्या करुणामय दर्शनाचा अनुभव देणारी ठरणार आहे. छ. सरफोजीराजे भोसले यांच्या काळात निर्माण झालेली मराठी भरतनाट्यमची समर्थ परंपरा आजही तितक्याच अभिमानाने जिवंत आहे. या परंपरेला जागतिक स्तरावर नेणारे नामांकित नृत्यगुरू आचार्य पार्वतीकुमार हे मालवणचे असल्याचा स्थानिकांना विशेष अभिमान आहे.

आचार्य पार्वतीकुमार आणि त्यांच्या गुरुपरंपरेने तंजावूर ते महाराष्ट्र असा सांस्कृतिक सेतू उभारला. छ. सरफोजीराजे भोसले लिखित नृत्यरचना त्यांनी अभ्यासपूर्वक आणि संशोधनात्मक पद्धतीने पुन्हा रसिकांसमोर आणल्या. त्यांच्या या वारशाचे सजीव दर्शन आजच्या कार्यक्रमात होणार आहे.

‘भक्तीरंग’ या नृत्याविष्काराचे संकल्पना आणि नृत्यदिग्दर्शन सौ. रागेश्री पारकर यांचे असून सादरकर्त्यांमध्ये मानसी पराडकर आणि सायली वाळके यांचा समावेश आहे.

मालवण—तंजावूर—तमिळ पारंपरिक भरतनाट्यम आणि छ. सरफोजीराजे भोसले कृत मराठी भरतनाट्यम—या अखंड परंपरेच्या संगमाचे सजीव सादरीकरण पाहण्यासाठी
आज सायं. ७.०० ते ८.३० या वेळेत भरड, श्री दत्त मंदिरात रसिकांनी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *