ज्येष्ठ विचारवंत दाजी पणशीकर यांचे निधन

Spread the love

ज्येष्ठ विचारवंत दाजी पणशीकर यांचे आज शुक्रवार दिनांक ६ जून रोजी संध्याकाळी ठाणे येथे अल्पशा आजाराने आपल्या राहत्या घरी निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी, दोन कन्या, जावई, मुलगा आणि सून असा परिवार आहे.


रामायण, महाभारताचे व्यासंगी, संतवाङ्मयाचे अभ्यासक, असलेल्या दाजींनी ५० वर्षाहून अधिक काळ आपल्या व्याख्याने आणि साहित्यातून समाजाचे प्रबोधन केले. आजोबा वासुदेवशास्त्री पणशीकर यांचा हिंदू धर्मग्रंथ, परंपरा यांचा वारसा त्यांनी पुढे नेला. देशविदेशात सुमारे अडीच हजार व्याख्याने दिली.


सोबत, मराठा, म. टाइम्स या वृत्तपत्रातील लेखमालांबरोबरच सामना दैनिकात सलग १६ वर्षे त्यांनी लिहिलेल्या विविध लेखमाला हा महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा वैचारिक ठेवा आहे. महाभारत एक सुडाचा प्रवास, कर्ण खरा कोण होता?, कथामृतम, कणिकनिती, शंकराचार्यांच्या स्तोत्रांवर आधारित स्तोत्र गंगा (दोन भाग), अपरिचित रामायण (पाच भाग), गानसरस्वती किशोरी आमोणकर – आदिशक्तीचा धन्योद्गार अशा त्यांच्या विविध ग्रंथांच्या आजवर ३० हून अधिक आवृत्या निघाल्या आहेत. विषयाचा व्यासंग, सखोल चिंतन, स्पष्ट भूमिका आणि परखड विवेचन ही त्याच्या लिखाणाची आणि वक्तृत्वाची वैशिष्ट्ये आहेत. मोठे बंधू प्रभाकर पणशीकर यांच्या नाट्यसंपदा नाट्यसंस्थेचे व्यवस्थापक म्हणून दाजींचा मराठी साहित्य, संगीत, नाट्य, चित्रपट, क्षेत्रातल्या दिग्गज कलाकारांशी जवळून संबंध आला. महाराष्ट्राचा गेल्या ५० वर्षांचा सांस्कृतिक इतिहास ज्ञात असलेले एक व्यक्तिमत्व हरपल्याची भावना व्यक्त होत आहे.


अंतिम संस्कार शनिवारी दि. ७ रोजी सकाळी साडेनऊ वाजता जवाहर बाग स्मशानभूमी, ठाणे पश्चिम येथे होणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *