महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय विनोदी कार्यक्रम म्हणजेच चला हवा येऊ द्या पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तेसुद्धा नव्या आणि दमदार रुपात. प्रेक्षकांना आता कॉमेडीचं गँगवॉर अनुभवायला मिळणार आहे. हास्याचा एक भन्नाट महोत्सव साजरा होणार आहे, जिथे महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट विनोदवीर आपलं विनोदी कौशल्य सादर करतील. या नव्या सिझनमध्ये धमाकेदार स्किट्स, गँग लॉर्ड्समध्ये रंगलेली बोलीची स्पर्धा, खास सेलिब्रिटींची हजेरी आणि उत्साही प्रेक्षकांच्या सहभागासह एक हटके मनोरंजनचा तडका असणार आहे. प्रेक्षकांचे लाडके कलाकार श्रेया बुगडे, कुशल बद्रिके आणि भारत गणेशपुरे यांच्यासोबत दमदार हास्यकलाकार गौरव मोरे आणि अभिनेता-दिग्दर्शक प्रियदर्शन जाधव मंचावर उतरणार आहेत.
या नव्या सिझनमध्ये जुन्या लोकप्रिय कलाकारांसोबत काही नवे चेहरेही दिसतील अशी चर्चा आहे. झी मराठीकडून यासाठी विशेष तयारी सुरू आहे. विनोदबुद्धी आणि प्रेक्षकांशी संवाद साधण्याची खास शैली ही या कार्यक्रमाची खरी ताकद आहे. त्यामुळेच नव्या सिझनमध्ये स्क्रिप्ट नव्याने लिहून आजच्या ट्रेंड्सवर भाष्य करणाऱ्या स्किट्स असतील, अशी माहिती सूत्रांकडून मिळते.
‘चला हवा येऊ द्या’ हा फक्त मनोरंजनाचा कार्यक्रम नसून तो मराठी कलाकारांना एक मजबूत व्यासपीठ देतो. या मंचावर अनेक सेलिब्रिटींनी आपल्या चित्रपटांची, मालिकांची किंवा वेबसिरीजची भन्नाट प्रमोशन केली आहेत. त्यामुळे नवा सिझन सुरु झाल्यावर मराठी मनोरंजनविश्वात नवीन चित्रपट, नवे चेहरे आणि गाजलेले कलाकार यांच्यासोबतचे भन्नाट एपिसोड पाहायला मिळणार, ही प्रेक्षकांसाठी पर्वणीच ठरणार आहे.
तथापि, काहीवेळा विषयांची पुनरावृत्ती, तोचतोचपणा किंवा स्किट्समध्ये दम नसणे या गोष्टी टीकेचा विषय ठरू शकतात. त्यामुळे नव्या सिझनमध्ये ‘चला हवा येऊ द्या’ची टीम हीच चूक टाळण्याचा पूर्ण प्रयत्न करणार असल्याचे समजते.
एकंदरीत, मराठी प्रेक्षकांच्या मनात या कार्यक्रमाबद्दलचे nostaligic connect कायम आहेच. आता हा नवा सिझन हसवण्याची धमाल पुन्हा नव्या जोमाने देतो का, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.