‘खजिन्याची शोधयात्रा‘ या पुस्तकाच्या लेखनासाठी प्रशांत पोळ यांनी व्यापक संशोधन आणि अभ्यास केला आहे. या पुस्तकाच्या माध्यमातून देशाचे प्राचीन वैभव, इतिहास, संस्कृती मांडण्यात आली असल्याने शासनाच्या माध्यमातून हे पुस्तक अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल. पुस्तकाच्या माध्यमातून ज्ञानाचा मोठा खजिना जनतेपर्यंत जाईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. प्रशांत पोळ लिखित ‘खजिन्याची शोधयात्रा‘ या पुस्तकाच्या बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित प्रकाशन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील, मध्य प्रदेशचे सार्वजनिक बांधकाम मंत्री राकेश सिंह, मंदिर स्थापत्य व मूर्तीशास्त्राचे अभ्यासक डॉ. गो. बं. देगलूरकर, स्नेहल प्रकाशनचे रवींद्र घाटपांडे, राष्ट्रीय पुस्तक न्यासचे संचालक व पुणे पुस्तक महोत्सवाचे मुख्य संयोजक राजेश पांडे आदी उपस्थित होते.
प्रशांत पोळ यांचे पुस्तक लेखनासाठी अभिनंदन करून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, आपला इतिहास, परंपरा, संस्कृतीचे जतन करणे आपले कर्तव्य आहे. आपल्या समाजाचे तेज आणि आत्माभिमान संपविण्याचे काम परकियांनी केल्याने आपण पारतंत्र्यात गेलो. भारत समृद्ध देश होता, परकीय आक्रमकांनी आपल्या संपत्तीची लूट केली. आपले ज्ञान आणि संस्कृती ही आपली शक्ती आहे हे लक्षात घेऊन ज्ञानकेंद्रे उध्वस्त करणे, आपल्या संस्कृतीची प्रतिके जमिनदोस्त करणे आणि आपल्यावर त्यांची संस्कृती, परंपरेचा पगडा बसविण्याचे काम सातशेहून अधिक वर्ष चालले. त्यामुळे आपला इतिहास माहित नसलेल्या पिढ्या तयार झाल्या आणि भारत पारतंत्र्यात गेला.
वेगवेगळ्या संशोधकांनी आपल्या संशोधनाने आपली संस्कृती भारताबाहेर गेली हा निष्कर्ष काढला आहे. जगातील इतर संस्कृती नष्ट पावल्या आहेत. पूर्वीपासून असलेली आणि अजूनही चालत आलेली भारत ही एकमेव संस्कृती आहे. ढोलावीरा, लोथलबद्दल प्रशांत पोळ यांनी पुस्तकात वर्णन केले आहे. आजच्या स्थापत्य शास्त्राला अपेक्षित गोष्टी सहा हजार वर्षापूर्वी असल्याचे त्यातून पहायला मिळते.
युरोपीय देशात जेव्हा संस्कृतीची संकल्पना स्पष्ट नव्हती तेव्हा आपली संस्कृती विकसित स्वरुपात होती. संस्कृतसारखी भाषा विकसित स्वरुपात आपल्याला माहित होती. भारताचा हा ज्ञानाचा खजिना फार जुना आहे. ही सिंधू संस्कृतीदेखील आहे आणि सरस्वती संस्कृतीदेखील आहे. भौतिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या संपन्न अशी ही संस्कृती होती. पहिल्या शतकातले भारताचे जगातील व्यापारातले स्थान ३३ टक्के होते. आपल्या या इतिहासाची माहिती आपल्याला असायला हवी. देशाचा हा इतिहास, आपले वैभव आणि गणितात भारताने केलेली प्रगतीदेखील या पुस्तकातून मांडण्यात आली आहे.
देशात हिंदवी स्वराज्य, मराठ्यांचे साम्राज्य होते ते आपण शिकू शकलो नाही. त्यामुळे आपली संस्कृती ज्ञान आपल्याला माहिती पाहिजे आणि ते पुढेही न्यावे लागेल. आयुर्वेदातील संहितावरही संशोधन झाले पाहिजे. या पुस्तकातून सर्वांना मार्गदर्शन मिळेल. ज्ञानाची ही शोधयात्रा अशीच सुरू रहावी, अशी अपेक्षा फडणवीस यांनी व्यक्त केली.
यावेळी लेखक प्रशांत पोळ म्हणाले, २०१७ साली प्रकाशित ‘भारतीय ज्ञानाचा खजिना‘ या पुस्तकाला सर्व शासकीय वाचनालयात वाचकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. भारतीय विचारवंत अनेक ज्ञानशाखांमध्ये जगामध्ये पुढे होते. दुर्दैवाने जगात ज्या परदेशी संशोधकांच्या नावावर विविध शोधांचे जनक असे नाव लागले ते अनेक शोध त्यापूर्वी भारतात लागलेले आहेत. मात्र, ते आपल्याला पुढे सांगितले गेले नाही. जगाचे विश्वगुरू होण्यासाठी आपण प्रयत्न करत असताना आपल्याला आपल्या समृद्ध संस्कृतीची, ज्ञानपरंपरेची माहिती आणि अभिमान असला पाहिजे, असेही ते म्हणाले.