मराठी उद्योजकतेचा गौरव करणारे आणि प्रेरणादायी ठरणारे ‘मराठी उद्योजक अभिमान गीत’ उद्योगमंत्री श्री. उदय सामंत यांच्या हस्ते सादर करण्यात आले. अर्थसंकेतचे संस्थापक डॉ. अमित बागवे यांच्या संकल्पनेतून साकारलेले हे गीत, ‘मी उद्योजक होणारच’ संस्थेद्वारे आयोजित ग्लोबल मराठी उद्योजकीय परिषदेच्या निमित्ताने, ऐतिहासिक बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये प्रथमच सादर करण्यात आले. यावेळी कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, सौ. रचना बागवे आणि मंदार नार्वेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. एक हजारहून अधिक मराठी उद्योजकांनी या सोहळ्यास हजेरी लावली.
हे गीत म्हणजे जिद्द, आत्मविश्वास आणि महाराष्ट्राच्या मातीतून येणाऱ्या प्रेरणेचा संगम आहे. या गाण्यातून मराठी उद्योजकांचा आत्मा, ध्येयवेडी वृत्ती आणि पुढे जाण्याची उर्जा प्रकट होते. मराठी उद्योजकतेचे पहिले ‘थीम सॉंग’ म्हणून या गीताची नोंद घेतली जात आहे.
२०१६ साली अमित बागवे यांनी प्रथमच मराठी उद्योजकांचा कार्यक्रम बॉम्बे स्टॉक एक्सचेंज येथे आयोजित केला होता. आता जवळपास दशकानंतर त्याच ठिकाणी मराठी उद्योजकतेवर आधारित गीताचे सादरीकरण होणे, ही एक ऐतिहासिक बाब आहे.
या गीताची विशेष बाब म्हणजे त्याचे संपूर्ण बोल, संगीत व गायन आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या सहाय्याने तयार करण्यात आले आहे. गीताची संकल्पना, संकलन आणि निर्मिती डॉ. अमित बागवे यांची आहे. हे गाणे ‘Dr. Amit Bagwe’ या युट्युब चॅनेलवर उपलब्ध आहे. डॉ. बागवे यांनी सांगितले की, बदलत्या युगात यशस्वी होण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाशी सुसंगत राहणे आवश्यक आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स केवळ तांत्रिक कामांसाठीच नव्हे, तर कौशल्याधारित कार्यांमध्येही प्रभावी ठरत आहे.
२० जून हा दिवस जागतिक मराठी उद्योजकता दिवस म्हणून साजरा करण्याच्या उद्देशाने हे गीत तयार करण्यात आले आहे. या निमित्ताने उद्योगमंत्री श्री. उदय सामंत यांनी १५ दिवसांच्या आत शासन निर्णय काढून २० जूनला अधिकृत जागतिक मराठी उद्योजकता दिवस म्हणून घोषित करण्याचे आश्वासन दिले. त्यांनी मराठी समाजाने हा दिवस अभिमानाने साजरा करण्याचे आवाहनही केले.
कार्यक्रमात यशस्वी मराठी उद्योजकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सांस्कृतिक कार्यमंत्री श्री. आशिष शेलार, डॉ. सुरेश हावरे, श्री. निलेश सांबरे, डॉ. अजित मराठे, श्री. वीरेंद्र पवार, श्री. राजेंद्र सावंत, राजश्री पाटील मॅडम, श्री. संतोष पाटील, डॉ. समीर कारखानीस आणि डॉ. संतोष कामेरकर यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थित उद्योजकांना मार्गदर्शन केले.